वाशीम नगर परिषद निवडणुक योग्य उमेदवार निवडा!
साप्ताहिक सागर आदित्य :
वाशीम नगर परिषद निवडणूकीचे पडघम हळू हळू वाजायला सुरुवात झाली आहे. प्रस्थापितांनी व्यूहरचना, चाचपणी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षात थोड्याफार शेकोट्या पेटल्या आहेत. विद्यमान नगरसेवकांच्या पक्षीय बैठका,त्यांच्यावर तिकीट मिळवायचे असेल तर काही सूचना हे सुरू आहे. या सर्व लगीनघाईत वाशीमकर जनतेनेही मंद गतीने कां असेना आत्मजागरण करण्याची आवश्यकता आहे.मी साधारणतः1988 पासुन नगर परिषद निवडणूकीत खारीच्या वाट्याने लक्ष ठेवून आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्वच पक्ष आपापले उमेदवार निवडणूकीत उभे करायचे.त्यांत सर्वांचेच काही निवडून यायचे आणि पडायचे देखिल. पण त्यानंतर निवडून आल्यावर मात्र सर्व जण एकाच नावेत बसायचे. मला आठवते विरोधी पक्ष नावाचा प्रकार नसायचाच.दुर्दैवाने तिच परंपरा आजही सुरू आहे.लोकशाहीच्या दृष्टीने सदर प्रकार घातक असला तरी दुर्दैवाने तो बिनदिक्कत सातत्यपूर्ण कायम आहे.मग मी यांवर चिंतन केले की निवडणुकीत पक्ष म्हणून लढायचे आणि निवडून आले की भोजनभाऊ होत असतील तर वाशीमकर म्हणून आपण जनतेनेहि विधायक विचार करणे आवश्यक. जर निवडणूकीनंतर हे सर्व पक्ष गुंडाळून ठेवत असतील तर आपण जनतेने निवडणूकीपूर्वीच पक्ष गुंडाळून ठेवले तर काय हरकत.पक्ष कोणताही असो उमेदवार योग्य हवा. जो वार्डासाठी, शहरासाठी तळमळीने काम करणारा, तन, मन,धनाने समाजसेवा करणारा असेल अशा विश्वासू कार्यकर्त्याचाच पक्षातित विचार केला पाहिजे. नाहीतरी निवडून आल्यावर हे एकाच गाडीत बसतात, विरोधी पक्ष बेण्याला शिल्लक नसतो मग कशाला आपण आपल्या वाशीमचे नुकसान करायचे. प्रत्येक पक्षात काही चांगले कार्यकर्ते असतातच की! मग पक्षाच्या बेडित न अडकता निवडू आपण आपले योग्य उमेदवार. पक्षीय विचारच करायचा असेल तर सर्व पक्षांनी घोषित कराव की बहुमत नसेल तर विरोधात राहू. संयुक्त सरकार बनवून एकाच पंक्तीत "वदनी कवळ घेता "म्हणणार नाही.नाहीतर ती जनतेची फसवणूक होईल.
आजवर आपण हि फसवणूक सहन केली पण आता या पूढे नको. यांबाबत घेतलेल्या चाचपणीत जनमत सकारात्मक आहे. हे विशेष.म्हणूनच माझे मत हेच की पक्षातित होऊन शहराला पूढे नेणारा योग्य उमेदवार निवडू. सक्षम उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असो आम्ही त्याचा विचार करू. निवडणुकीनंतर असे ऊमदे उमेदवार एकत्र झाल्यास तयार झालेले संयुक्त सरकार काहीतरी विशेष करेल. प्रयोग करून पाहायला हरकत नसावी.
0 Response to "वाशीम नगर परिषद निवडणुक योग्य उमेदवार निवडा!"
Post a Comment