लोकसहभागातून ग्रामीण विकासाला नवी गती!
साप्ताहिक सागर आदित्य
🌿 लोकसहभागातून ग्रामीण विकासाला नवी गती! 🇮🇳
'विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी (ग्रामीण) अधिनियम-२०२५' योजनेचा वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत कळंबा महाली येथे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, रोजगाराच्या संधी वाढाव्यात, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व्हावे आणि गावांचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधला जावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी "विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण रोजगार, शाश्वत आजीविका आणि लोकसहभागाची मजबूत सांगड आवश्यक आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत वेळेत आणि पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा," असे प्रतिपादन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, ग्रामीण विकासाचा पाया म्हणजे रोजगारनिर्मिती, जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सार्वजनिक मालमत्तेची निर्मिती आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे होय. ग्रामपंचायती, विविध विभाग आणि ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून गावांच्या गरजेनुसार दर्जेदार व टिकाऊ विकासकामे उभारली गेल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ मिळेल.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचाही उल्लेख करून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घराघरांत जाऊन गणनापत्र भरून घेणार असल्याने प्रत्येक नागरिकाने अचूक व संपूर्ण माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असे त्यांनी सांगितले. मतदार यादी अद्ययावत व त्रुटीरहित ठेवणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यात ११७ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात उल्लेखनीय योगदान दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत ग्रामीण विकासातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ग्रामपंचायत परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन व संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) संजय नागटिळक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, तहसीलदार निलेश पळसकर, गटविकास अधिकारी रविंद्र सोनवणे, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोजगाराची हमी • शाश्वत आजीविका • जलसंधारण • पर्यावरण संवर्धन • सक्षम ग्रामपंचायती • लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकास
विकसित गाव... सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्था... आणि विकसित भारताकडे आत्मविश्वासाने वाटचाल! 🇮🇳🌱
#विकसितभारत #ग्रामीणविकास #रोजगारवआजीविका #मनरेगा #लोकसहभाग #जलसंधारण #वृक्षारोपण #मतदारयादीविशेषसखोलपुनरीक्षण #Washim #जिल्हाप्रशासनवाशिम
0 Response to "लोकसहभागातून ग्रामीण विकासाला नवी गती!"
Post a Comment