सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची गावागावात जनजागृती सुरू
साप्ताहिक सागर आदित्य
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर
घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची गावागावात जनजागृती सुरू
वाशिम, : स्वच्छ पर्यावरण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची अर्थात ग्रामपंचायतींची जबाबदारी असल्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाभरात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना याबाबत सविस्तर संयुक्त पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर बुधवारी वाशिम तालुक्याचे गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांनी तोंडगाव, आडोळी आणि तामसी या गावांना भेट देऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी नाडेप खत खड्डे, कचरा विलगीकरण केंद्र तसेच गावातील स्वच्छता व्यवस्थापन सुविधांची पाहणी करण्यात आली. गावात उघड्यावर कचरा टाकू नये तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करावे, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या.
यादरम्यान जिल्हा परिषदेचे राम श्रृंगारे, तोंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना भगवानराव गोटे, उपसरपंच श्री गोटे, ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश भांडारकर, आडोळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान इढोळे, परमेश्वर इढोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सतिश इढोळे आणि दिपक इढोळे, ग्रामपंचायत अधिकारी अरविंद पडघन, तामसी ग्रामपंचायतीचे अमोल कवर, ग्रामपंचायत अधिकारी लिंबाजी लांडगे तसेच गट समन्वयक वसंता इंगोले उपस्थित होते.
-----------
जनजागृतीसाठी पोस्टर व माहिती पुस्तिकांचा वापर:
घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष पोस्टर आणि माहिती पुस्तिकांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. यामध्ये घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, नाडेप खत खड्ड्यांचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन तसेच गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. ग्रामस्थांनी स्वच्छता विषयक उपलब्ध साधनांचा नियमित वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले.
---------
जिल्ह्यातील 21 बाजारपेठेची गावे टार्गेटवर:
घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 21 बाजारपेठेच्या ग्रामपंचायतींना प्राधान्याने लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील काटा, तामसी, तोंडगाव, अनसिंग; मालेगाव तालुक्यातील मुंगळा, किन्ही राजा, शिरपूर, मेडशी; रिसोड तालुक्यातील वाकद, रिठद, हराळ, केनवड; मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा, शेलूबाजार; कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार, पोहा, धामणी खडी, धनज बुद्रुक, कामरगाव तसेच मानोरा तालुक्यातील पोहरादेवी आणि शेंदुर्जना आढाव या गावांचा समावेश आहे.
ग्रामीण भाग स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ग्रामपंचायतींसह नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Response to "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषद प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची गावागावात जनजागृती सुरू"
Post a Comment