आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक वाशिम तालुक्यातील काटा तसेच वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात
साप्ताहिक सागर आदित्य
घरभेटीतून जनगणना नोंदणीची प्रत्यक्ष रंगीत तालीम
जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी संवाद; सहकार्याचे आवाहन
वाशिम, आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक वाशिम तालुक्यातील काटा तसेच वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात
दि.८ एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. या उपक्रमातून जनगणना प्रक्रियेची सखोल माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वतः घरोघरी भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. जनगणना ही देशाच्या नियोजन प्रक्रियेचा कणा असून, अचूक माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सांगत त्यांनी नागरिकांना आगामी नोंदणी प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रात्यक्षिकादरम्यान क्षेत्रीय प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष घरभेटी देऊन माहिती संकलनाची पद्धत, विचारले जाणारे प्रश्न, तसेच डिजिटल साधनांचा वापर याबाबत प्रात्यक्षिक प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे नागरिकांच्या शंकांचेही निरसन होऊन जनगणनेबाबत विश्वास आणि जागरूकता वाढीस लागली.
यावेळी जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, परिविक्षाधीन तहसीलदार आकाश वर्मा, निलेश पळसकर, चार्ज अधिकारी निलेश गायकवाड,मास्टर ट्रेनर डॉ. राजेश गवई, कार्तिक गडलिंग, मालेगाव तहसीलदार तथा चार्ज ऑफिसर दीपक पुंडे, तसेच जनगणना जिल्हा समन्वयक शशांक रूखने,नायब तहसीलदार साहेबराव नप्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संबंधित अधिकाऱ्यांनीही या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत प्रशिक्षकांना आवश्यक सूचना दिल्या. या उपक्रमामुळे जनगणना २०२७ ची पूर्वतयारी अधिक भक्कम होत असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होत आहे. यावेळी सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "आगामी जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक वाशिम तालुक्यातील काटा तसेच वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात "
Post a Comment