-->

जिल्हा परिषद वाशिमच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

जिल्हा परिषद वाशिमच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा



 साप्ताहिक सागर आदित्य 

स्पेलिंग बी स्पर्धेचा जिल्हास्तरीय सोहळा उत्साहात संपन्न

२४ गुणवंत विद्यार्थ्यांसह ५० हून अधिक शिक्षकांचा गौरव


जिल्हा परिषद वाशिमच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 

(दि. 28) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषिक कौशल्याचे प्रदर्शन करत २४ विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले.

स्थानिक सुशीलाताई जाधव महाविद्यालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ॲड. विजयराव जाधव उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी संजय ससाणे, प्राचार्य डॉ. भीमराव महाजन, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, बिरादार, ओपन लिंक फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक रघुनाथ वानखडे यांची उपस्थिती होती. 

या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ८ वीच्या सुमारे २०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम फेरीत निवड झालेल्या २४ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात सीईओ अर्पित चौहान म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेची भीती दूर करण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत उपयुक्त ठरतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पुढील वर्षीही या स्पर्धेचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------


बॉक्स:

शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद:

कार्यक्रमादरम्यान शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या इंग्रजी शब्दसंपत्ती, उच्चार आणि आत्मविश्वासाची चाचपणी केली. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांनी सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. स्पेलिंग बी सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता आत्मविश्वासाने इंग्रजी भाषा शिकावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

---------------------

या सोहळ्यात विद्यार्थ्यांबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या ५० हून अधिक शिक्षकांचा तसेच विविध शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला. विनोबा ॲपच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून घेण्यात आलेल्या सराव परीक्षांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा, उपक्रमशील केंद्रप्रमुख, ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते, तसेच शालेय परिपाठ व ‘लायब्ररी बॅग’ उपक्रमांतर्गत पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------

-राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम


0 Response to "जिल्हा परिषद वाशिमच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) आणि ओपन लिंक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article