बसमध्ये प्रवाशांचे दागिने आणि पर्स लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा महिला टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश
साप्ताहिक सागर आदित्य
चालत्या बसमधून दागिने चोरी करणारी टोळी जेरबंद; वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..!
संभाजीनगरच्या महिला चोरट्यांच्या टोळीला ठोकल्या बेड्या..!
कारवाईदरम्यान सोन्याची पोत आणि चोरीची मोटारसायकल जप्त..!
वाशिम जिल्ह्यात चालत्या बसमध्ये प्रवाशांचे
दागिने आणि पर्स लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा महिला टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१३ मार्च २०२६ रोजी फिर्यादी निर्मला दिलीप श्रीनाथ (रा. रिसोड) या बसने रिसोडहून उमरखेडला जात होत्या. अनसिंगजवळ चालत्या बसमध्ये त्यांची पर्स चोरीला गेली होती. या पर्समध्ये सोन्याची पोत आणि रोख रक्कम होती. याप्रकरणी अनसिंग पोलीस ठाण्यात गुन्हा (अ.क्र. ८२/२०२६, कलम ३०३(२) भा.न्या.सं.) दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती आणि सापळा
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान बसमध्ये चोरी करणाऱ्या काही महिला असल्याची माहिती समोर आली. २० मार्च २०२६ रोजी वाशिम बस स्थानक परिसरात काही महिला संशयास्पद रितीने वावरत असल्याची पक्की बातमी मिळताच, एलसीबीच्या पथकाने महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी: १. लक्ष्मी व्यंकटेश गड्डी (वय ३५ वर्षे) २. कविता अशोक गड्डी (वय ३० वर्षे) ३. गंगम्मा उलगया गड्डी (वय ५० वर्षे) (सर्व राहणार: चिखलठाणा, जि. संभाजीनगर)
चौकशीदरम्यान या महिलांनी १३ मार्च रोजी बसमध्ये पर्स चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या टोळीकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याचबरोबर, रिसोड पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याचा (अ.क्र. ११८/२०२६) तपास करताना पथकाने संतोष सुदाम पवार (रा. रिसोड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करून रिसोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. त्याच्याकडून परिसरातील आणखी काही मोटारसायकल चोऱ्यांचे गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.
तपास पथक आणि मार्गदर्शक
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने केली:
प्रदीप परदेशी (पोलीस निरीक्षक, एलसीबी वाशिम)
सपोनि योगेश धोत्रे, पोउपनि शेखर मास्कर आणि स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण टीम.
0 Response to "बसमध्ये प्रवाशांचे दागिने आणि पर्स लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा महिला टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश "
Post a Comment