महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/ अधिकारी संघटना मुंबई जिल्हा शाखा, वाशिम
साप्ताहिक सागर आदित्य
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/ अधिकारी संघटना मुंबई जिल्हा शाखा, वाशिम
यांच्या विनंतीवरून जिल्हा परिषद वाशिम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर बैठक संपन्न झाली.
बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज वानखेडे, जिल्हा सचिव विवेक भुयार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पुंड, शिक्षण विभागातील सतीश लहामगे (कप्रअ), सामान्य प्रशासन विभागातील बन्सोड (वरिष्ठ सहाय्यक), क्षीरसागर (मुख्य लेखा वित्त अधिकारी), लेखा विभागातील पंधारे (सलेअ) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016 मधील कलम 34 अन्वये शासकीय/निमशासकीय सेवेमध्ये 4% आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी तसेच कलम 20 नुसार दिव्यांग व्यक्तींना वाजवी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. अधिनियमात विविध हक्क प्रदान करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.
दि. 30/06/2016 पासून काल्पनिक पद्धतीने दिव्यांग पदोन्नती आरक्षणाचा लाभ देणे, 4% प्रमाणे दिव्यांग संवर्गासाठी बिंदूनामावली मंजूर करणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांना मान्य दिनांक देणे, दि. 29/10/2025 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांची माहिती राज्य दिव्यांग आयुक्तांकडे पाठविणे, UDID अनिवार्यता व बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत अहवाल सादर करणे, सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे उपलब्ध करून देणे तसेच पंचायतराज संस्थांनी त्यांच्या उत्पन्नाच्या 5% निधीतून दिव्यांग कल्याणासाठी खर्च करणे आदी मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवून संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.
याबाबत संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे दिव्यांगांच्या प्रश्नांप्रती दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
0 Response to "महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/ अधिकारी संघटना मुंबई जिल्हा शाखा, वाशिम "
Post a Comment