जनजागृती हाच सिकलसेलमुक्त भविष्यासाठी खरा पाया जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
जनजागृती हाच सिकलसेलमुक्त भविष्यासाठी खरा पाया
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
अरुणोदय – सिकलसेलमुक्त भविष्यासाठी’ या विशेष अभियानाचा शुभारंभ
: सिकलसेल हा आजार केवळ वैद्यकीय प्रश्न नसून तो सामाजिक जाणीवेशीही निगडित आहे. योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि समाजाची सक्रिय भागीदारी यामुळेच सिकलसेलमुक्त पिढी घडवता येईल. यासाठी जनजागृती हाच सिकलसेलमुक्त भविष्यासाठी खरा गाभा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ‘अरुणोदय – सिकलसेलमुक्त भविष्यासाठी’ या विशेष अभियानाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात विविध स्तरांवर व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तपासणी शिबिरे, मार्गदर्शन सत्रे व समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे, बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग राठोड, बालरोग तज्ज्ञ डॉ. बगाडे, , तसेच बाकलीवाल महाविद्यालय येथील एनसीसी अधिकारी अमोल काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘अरुणोदय… सिकलसेलमुक्त भविष्यासाठी’ या विशेष अभियानाचा वाशिम जिल्ह्यात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते औपचारिक शुभारंभ झाला. हा कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम येथील डी.ई.आय.सी. विभागात पार पडला.
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे बोलतांना सांगितले की, सिकलसेल हा आजार संसर्गजन्य नसून अनुवांशिक आहे. सिकलसेल वाहक अथवा रुग्णाने सिकलसेल वाहक किंवा रुग्णाशी विवाह केल्यास पुढील पिढीत या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. मात्र सिकलसेल वाहक अथवा रुग्णाने सामान्य व्यक्तीशी विवाह केल्यास पुढील पिढीत सिकलसेल होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे लग्नपत्रिका जुळवण्यापूर्वी सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. पी. एस. ठोंबरे यांनी मांडली. प्रस्तावनेत त्यांनी माहिती देताना सांगितले की, वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत सिकलसेलचे १७३ रुग्ण असून २,११७ सिकलसेल वाहक आहेत. त्यामुळे सिकलसेल प्रतिबंधासाठी जनजागृती व तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे.
या अभियानाअंतर्गत आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन सिकलसेल तपासणी, निदान, उपचार, समुपदेशन तसेच व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. सिकलसेल आजार आढळून आल्यास घाबरून न जाता जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. विजय काळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन सिकलसेलमुक्त व निरोगी समाजनिर्मितीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एनसीसी कॅडेट्स, शासकीय परिचर्या महाविद्यालय वाशिम येथील विद्यार्थिनी तसेच आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Response to "जनजागृती हाच सिकलसेलमुक्त भविष्यासाठी खरा पाया जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर"
Post a Comment