मकरसंक्रांतीच्या पारंपरिक तिळगुळाला आरोग्यदायी चियाची जोड देत नावीन्यपूर्ण स्वरूप देणाऱ्या चिया तिळगुळ विक्री महोत्सवाचे उद्घाटन
साप्ताहिक सागर आदित्य
'प्रशिक्षणातून' तयार होणारी 'मूल्यवर्धित उत्पादने' हीच ग्रामीण अर्थव्यवस्थेची खरी ताकद
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
जिल्हाधिकारी कार्यालयात 'चिया तिळगुळ' नाविन्यपूर्ण महोत्सवाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले उद्घाटन
साप्ताहिक सागर आदित्य
शेतकरी प्रशिक्षणातून तयार होणारी मूल्यवर्धित उत्पादने हीच ग्रामीण अर्थव्यवस्थेची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
मकरसंक्रांतीच्या पारंपरिक तिळगुळाला आरोग्यदायी चियाची जोड देत नावीन्यपूर्ण स्वरूप देणाऱ्या चिया तिळगुळ विक्री महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते फित कापून उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षित शेतकरी उत्पादक गटांनी तयार केलेल्या चिया तिळगुळ उत्पादनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी विक्रीला गती मिळाल्याचे दिसून आले.
प्रशिक्षित शेतकरी उत्पादक गटांनी तयार केलेल्या या चिया तिळगुळाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विक्रीत चांगलीच गती पाहायला मिळाली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वतः चिया तिळगुळ खरेदी करून शेतकरी उत्पादक गटांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. त्यांनी विक्रीसाठी उपस्थित असलेले शेतकरी उत्पादक विमल राजगुरू, माधवी झनक, उषा देशमुख, स्वार्था काल्वे व ज्ञानेश्वर बेद्रे यांच्याशी थेट संवाद साधत उत्पादन प्रक्रिया, विपणन व्यवस्था व भविष्यातील संधी याविषयी सविस्तर माहिती घेतली.
बंगळुरू येथे झालेल्या विशेष प्रशिक्षणातून प्रशिक्षित झालेल्या शेतकरी बांधवांनी या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले असून आरोग्यदायी व दर्जेदार उत्पादनांची मांडणी आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे. चिया, तीळ व गूळ यांचे संतुलित मिश्रण असलेले हे तिळगुळ आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून येत आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे, कृषी उपसंचालक हिना शेख, विधी अधिकारी महेश महामुने यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम शेतकरी उत्पादक गटांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणारा ठरत असून, नव्या पिढीला आरोग्यदायी व स्थानिक उत्पादनांकडे आकर्षित करणारा ठोस प्रयत्न म्हणून ‘चिया तिळगुळ महोत्सव’ विशेष ठरत आहे.
0 Response to "मकरसंक्रांतीच्या पारंपरिक तिळगुळाला आरोग्यदायी चियाची जोड देत नावीन्यपूर्ण स्वरूप देणाऱ्या चिया तिळगुळ विक्री महोत्सवाचे उद्घाटन "
Post a Comment