जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ३.३० पर्यत ४६.५३ टक्के मतदान
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ३.३० पर्यत ४६.५३ टक्के मतदान
• दिव्यांग, ज्येष्ठ व नवमतदारांनी केले उत्साहात मतदान
वाशिम ,दि. २ डिसेंबर जिल्ह्यात रिसोड, मंगरूळपीर, कारंजा या नगरपरिषदसाठी व मालेगाव या नगरपंचायतसाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी आज दि.२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळी ७.३० वाजेपासून लांब रांगा लावल्या होत्या. दिव्यांग, ज्येष्ठ व मतदारासोबत नवमतदारांनी मतदानासाठी उत्साहात उपस्थिती लावली.
*रिसोड नगर परिषद अंतर्गत शहरातील १०५ वर्षीय आजीबाई चंद्रभागा मल्लिका अर्जुन माळेकर यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.तर मालेगाव नगरपंचायत निवडणुकीत शहरातील १०३ वर्षीय सुबरावी गुलाम हुसेन यांनी एवढ्या उच्च वयोमानातही त्यांनी दाखवलेली जागरूकता व लोकशाहीप्रतीची निष्ठा दिसून आली*.
दुपारी ३.३० पर्यंत एकूण ६९ हजार १२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
रिसोड नगरपरिषदसाठी एकुण १५ हजार ६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष ७ हजार ६०४,महिला ८ हजार ८० असे एकूण ५२.३५% मतदान झाले.
मंगरूळपीर नगरपरिषदसाठी १३ हजार ३२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष ६ हजार ७३५ महिला ६ हजार ५९० असे एकूण ४५.७६% मतदान झाले.
कारंजा नगरपरिषद अध्यक्ष व सदस्यांसाठी ३० हजार ४७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.यामध्ये पुरुष १५ हजार ५१९ ,महिला १४ हजार ४४९ व इतर ४ मतदार, असे एकूण ४३.३३% मतदान झाले.
आणि मालेगाव नगरपंचायती करिता ९ हजार ६४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष ४ हजार ७६९ महिला ४ हजार ८७८ असे एकूण ५०.३३% मतदान झाल्याची नोंद आहे.
या निवडणुकीसाठी वॉर रुम कक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
यावर्षी निवडणूक विभागाने प्रत्येक नगरपरिषदमध्ये आदर्श, दिव्यांग मतदान केंद्र उभारले होते. याशिवाय पर्दानसिन केंद्र कार्यरत करण्यात आले होते. प्रशासनाने यावेळी प्रत्येक केंद्रामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या होत्या. यामध्ये पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम, दिवाबत्ती, बसण्याची व्यवस्था, काही केंद्रावर सेल्फी पॉईट व अन्य सजावट करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने मतदाराचे आभार व्यक्त केले आहे. जिल्ह्यामध्ये याकाळात कोणत्याही अप्रिय घटनेची नोंद नाही.अंतिम उशिरा अधिकृत अंतिम आकडेवारी मिळण्याची शक्यता आहे.
नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे यांनी आज मालेगाव येथील विविध मतदान केंद्रांना भेट दिली.
या भेटीदरम्यान त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सोयी, ईव्हीएम मशीनची स्थिती, क्यू व्यवस्थापन तसेच मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदान प्रक्रियेबाबत माहिती घेतली. निरीक्षकांनी मतदान केंद्रावर सुरळीत व शांततेत मतदान पार पडत असल्याचे समाधान व्यक्त केले.
0 Response to "जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी दुपारी ३.३० पर्यत ४६.५३ टक्के मतदान"
Post a Comment