जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाला गती द्यावी
साप्ताहिक सागर आदित्य
जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाला गती द्यावी
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिम जिल्ह्यातील १८९ गावांच्या प्रगतीचा आढावा
वाशिम, पोकरा प्रकल्पाची अंमलबजावणी निश्चित वेळेत, निकषांनुसार आणि समन्वयातून झाली तर जिल्ह्यात हवामान-सक्षम, शाश्वत शेती उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित साध्य होईल. गावपातळीवरील जनजागृती वाढवून,अर्ज प्रक्रिया गतीमान करून आणि सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी (पोकरा) प्रकल्पातर्गत वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी श्री .कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आरीफ शाहा, कृषि उपसंचालक हिना शेख, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे तसेच सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पातील प्रगती, उद्दिष्टे आणि आव्हाने याबाबतचे सविस्तर सादरीकरण संतोष वाळके यांनी केले.
वाशिमची प्रकल्पासाठी निवड : राज्य शासनाचा निर्णायक टप्पा
पोकराच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणी लक्षात घेता राज्यातील इतर जिल्ह्यांची मागणी विचारात घेऊन मंत्रिमंडळाच्या २८ जून २०२३ च्या बैठकीत प्रकल्प विस्तारास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर ३० जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार वाशिम जिल्ह्याचा समावेश निश्चित करण्यात आला.पुढे, टप्पा-२ अंतर्गत शासन निर्णय क्र.दि. १४ ऑक्टोबर २०२४ नुसार जिल्ह्यातील १८९ गावांची निवड करण्यात आली असून या गावांमध्ये शेतीला हवामान बदलास अनुरूप बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
बैठकीदरम्यान प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे पुन्हा अधोरेखित करण्यात आली. शेतीची उत्पादकता व शाश्वतता वाढविणे,पाण्याचा कार्यक्षम व तंत्रज्ञानाधारित वापर, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पद्धतींचा अवलंब हे सर्व उद्दिष्टे हवामान बदलाचा वेगाने वाढणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी असून प्रकल्पाची दिशा – शाश्वत, आधुनिक आणि हवामान सक्षम शेतीकडे वाटचाल व्हावी असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
ग्राम कृषि विकास समित्यांच्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा
प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या प्रत्येक गावात गठित करण्यात येणाऱ्या ग्राम कृषि विकास समितींचे गठन, त्यांची प्रगती, जबाबदाऱ्या व भविष्यातील कार्ययोजना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आढावा घेतला. या समित्या गावपातळीवरील प्रकल्प व्यवस्थापनाचा मुख्य आधार असल्याचे मत त्यांनी मांडले.
याशिवाय कृषिताईंची नेमणूक,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळा,सूक्ष्म नियोजन प्रक्रियेचे वेळापत्रक,अर्ज मंजुरी व प्रक्रियेची गती
यांबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी तपशीलवार चर्चा केली.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीला अधिक वेग देण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी सर्व आराखडे वेळेत आणि निश्चित मर्यादेत सादर करणे,गावपातळीवरील जनजागृती मोहीम अधिक व्यापक व प्रभावी करणे,अर्ज संख्येत वाढ व्हावी यासाठी अधिक सक्रिय काम,तालुकास्तरीय अधिकारी लॉगिनवरील अर्ज वेळेत जिल्हास्तरीय समितीकडे फॉरवर्ड करतील याचे पालन,नॉर्म्स प्रमाणे प्रकल्पाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. वेळेत काम, प्रभावी जनजागृती आणि अर्ज प्रक्रिया सुटसुटीत करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील सर्व कृषी यंत्रणा समन्वय साधून कार्य केल्यास पोकरा प्रकल्पातून अपेक्षित परिणाम साध्य होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 Response to "जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाला गती द्यावी "
Post a Comment