
“शासकीय योजनांचा लाभ घ्या” जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर मुसळवाडी येथे आदी सेतू शिबीर उत्साहात संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
“शासकीय योजनांचा लाभ घ्या” जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
मुसळवाडी येथे आदी सेतू शिबीर उत्साहात संपन्न
वाशिम,दि.१ ऑक्टोबर नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. प्रत्येक विभागामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात येतो. नागरिकांनी योजनांची माहिती संग्रही ठेवावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.आज दि.१ ऑक्टोबर रोजी सेवा पंधरवड्याच्या औचित्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आदी सेतू शिबीराचे आयोजन मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथे करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर बोलत होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार दीपक पुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर,तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे, गटविकास अधिकारी रमेश कंकाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या महाराजस्व अभियान राबविले जाते. सेवा पंधरवडा या अभियानाच्या माध्यमातून योजनांची माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने आदी सेतू शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत विविध विभागांच्या योजनांचा देखील माहिती दिली. ऍग्रीस्टॅक योजनेतून फार्मर आयडी बनवून कृषी योजनांचा लाभ घ्यावा. कुटुंबांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड तयार करून घ्यावे. कार्यक्रमस्थळी असलेल्या विविध स्टॉलच्या माध्यमातून अर्ज भरून घ्यावेत असे आवाहनही यावेळी केले.
पाल्यांना शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. वृत्तपत्र वाचनासाठी प्रोत्साहित करावे. शिष्यवृत्ती व नवोदयच्या परिक्षांना बसवावे.गावातील यशस्वी, उच्च पदस्थ नागरिकांची माहिती देवून करिअरच्या दृष्टीने पालकांनी सजग असावे. पाल्यांच्या बुध्दीला बालपणापासूनच चालना मिळावी यासाठी प्रयत्नशील असावे.स्पर्धापरिक्षेची तयारी करून घ्यावी.तुमची योग्य साथ लाभली तर मुले निश्चितच पुढे जातील. गावातील मुलभूत सुविधांसाठी निश्चितच जिल्हा प्रशासन पाठीशी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी अश्वस्त केले.
प्रास्ताविक तहसीलदार दीपक पुंडे यांनी. त्यांनी सेवा पंधरवडामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आदीवासीबहूल गावांची निवड करून योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध व्हावा हा या शिबीराचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये तालुका कृषी अधिकारी यांनी रोहयो अंतर्गत सिंचन विहीर, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, फळबाग योजना, कृषी अवजारे, दालमिल, चक्की, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, बचतगटांना उद्योग अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती दिली.
तालुका आरोग्य अधिकारी प्रधानमंत्री मातृवंदना योजना, १०८ व १०२ रुग्णवाहिका, पोर्टेबल एक्स रे , तपासणीचा लाभ घ्यावा असे सांगितले.गटविकास अधिकारी प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजनेची माहिती दिली.बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी लेक लाडकी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बेबी केअर किट,पोषण आहार अभियानाची माहिती दिली.
भूमी अभिलेख उपअधिक्षक यांनी स्वामित्व सनद योजनेची माहिती दिली.
अपर जिल्हाधिकारी .पाटील यांनी आदी सेतू शिबीराची माहिती दिली. 'सेवा परमो धर्म' ह्या ब्रिद वाक्याला अनुसरुन विविध योजनांची माहिती दिली.शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासन आज आपल्या पंचक्रोशीत आले आहे. या शिबिरातून महसूल विभागाच्या सेवांचा लाभ, प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कुंभेजकर व उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये १६९ उत्पन्न दाखले, २८ जातप्रमाणपत्र, ४७ अधिवास प्रमाणपत्र, ५५ ई शिधापत्रिका, ३८ नमूना ८, २० स्वामित्व सनद, २ कृषी यंत्र, ३ लेक लाडकी, संजय गांधी योजनेचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत, आदीवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली .यानंतर आदी सेतू केंद्राचे फित कापून थाटात उद्घाटन करून जिल्हाधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांनी विविध स्टॉलची पाहणी यावेळी केली. पी.एम.किसान, संजय गांधी निराधार योजना, सेतू सुविधा केंद्र, पुरवठा विभाग, आधार सेंटर, आदी सेवा केंद्र, प्रधानमंत्री मातृवंदना योजना , एकात्मिक बाल विकास प्रकल्प, अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या पोषण आहार पाककृती, आदी स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यक्रमाला नायब तहसीलदार रंजना गोरे, ग्राममहसुल अधिकारी महादेव डाखोरे,मंडळ अधिकारी तुकाराम इप्पर, मंडळ कृषी अधिकारी प्राजक्ता कुचेकर, वैद्यकीय अधिकारी आशिष बियाणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका,नवदुर्गा संस्थान ट्रस्टचे संचालक मंडळ, नागरिक ,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.संचालन राजेश सुर्वे यांनी केले. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबीराला लाभला.
0 Response to "“शासकीय योजनांचा लाभ घ्या” जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर मुसळवाडी येथे आदी सेतू शिबीर उत्साहात संपन्न"
Post a Comment