राज्यात वाशिमची आरोग्य सेवा अव्वलच ; सलग तिसऱ्यांदा वाशिमचे ‘सीएस’ नंबर वन !
साप्ताहिक सागर आदित्य
राज्यात वाशिमची आरोग्य सेवा अव्वलच ; सलग तिसऱ्यांदा वाशिमचे ‘सीएस’ नंबर वन !
निर्देशांकाची तंतोतंत अंमलबजावणी : सीएस डाॅ. अनिल कावरखे यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी
वाशिम,: काहीतरी नवीन करण्याची तळमळ, गोरगरीब रुग्णांचे आरोग्य ‘सुदृढ’ करण्याची सकारात्मक मानसिकता, वरिष्ठांशी योग्य समन्वय व सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालण्याची दूरदृष्टी असेल तर अशक्यप्राय वाटणारे कामही सहज सुलभरित्या पुर्णत्वास जाते, याची प्रचिती वाशिमच्या जिल्हा शल्य चिकित्सक ( सीएस) डाॅ. अनिल कावरखे यांच्या काम करण्याच्या शैलीवरून आली आहे. आरोग्य विभागातील निर्देशांकावर आधारीत रॅंकिंगमध्ये सलग तिसऱ्यांदा ते राज्यात नंबर वन आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डाॅ. पांडूरंग ठोंबरे हे नंबर दोन वर आहेत. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वाशिमची मान अभिमानाने उंचावली आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत मातृ स्वास्थ्य, मुलांचे आरोग्य, कुटुंबनियोजन यासह एकूण ३० निर्देशांकाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पथकामार्फत डीएचओ व सीएसच्या अधिनस्त असलेल्या आरोग्य संस्थांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी व पाहणी केली जाते. ऑक्टोबर २०२४ मध्ये विशेष चमूमार्फत सरकारी रुग्णालयांमध्ये पाहणी व पडताळणी केली होती. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सरकारी रुग्णालयांत माता व बालकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा, लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेही रूग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट असल्याचा शेरा या चमुने दिला. महिलांची प्रसुती, अद्ययावत डायलिसीस सेवा, कुपोषित बालकांसाठी पोषण पुर्नवसन केंद्र (एन.आर.सी.), क्रिटीकल रुग्णांसाठी आयसीयु तसेच शस्त्रक्रियांकरीता अत्याधुनिक व सुसज्ज शस्त्रक्रियागृह, मोतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्तपेढी, सोनोग्राफी व सी. टी. स्कॅन यांसह अन्य आरोग्य सेवांमध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद व सर्वोत्कृष्ट असल्यावर या पथकाने तपासणीदरम्यान शिक्कामोर्बत केले. ऑक्टोबर महिन्यातील रॅंकिंगचा अहवाल १० डिसेंबर रोजी जाहिर झाला. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गाच्या रॅंकिंगमध्ये डाॅ. अनिल कावरखे राज्यात प्रथम तर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातून डाॅ. पांडूरंग ठोंबरे यांचा द्वितीय क्रमांक आला. या दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. मॅडम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनात व सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आरोग्य संस्थांमध्ये केलेले बदल आणि रुग्णांना पुरविलेली आरोग्य सेवा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरली. यामुळे राज्यात वाशिमचे नाव पुन्हा एकदा चमकले आहे.
...................
राज्यात प्रथम येण्याची सलग तिसऱ्यांदा कामगिरी
यापूर्वी निर्देशांक अंमलबजावणीत वाशिम जिल्हा टाॅप फाईव्हमध्येदेखील नसायचा. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे यांनी दीड वर्षांपूर्वी सूत्रे हाती घेतल्यानंतर सकारात्मक बदल करायला सुरूवात केली. ते स्वत:च शासनाने नेमून दिलेल्या वेळेपूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित राहत असल्याने इतर अधिकारी व कर्मचारीदेखील शासकीय वेळेचे बंधन पाळत आहेत. रुग्णांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवत आहेत. आरोग्य संस्थांमध्ये मुलभूत व भौतिक सुविधा उपलब्ध होत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित साफसफाई, नीटनिटकेपणा प्रकर्षाने दिसून येतो. डाॅ. पांडूरंग ठोंबरे यांनीदेखील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ठोस कार्यवाही केली. यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचा आरोग्य सेवेवर विश्वास बसल्याने सरकारी आरोग्य संस्थांमध्ये रुग्णसंख्या प्रचंड वाढत आहे. या दोघांचे परिश्रम आता फळाला आले असून, याचीच पोचपावती म्हणून राज्यात आरोग्य विभागाच्या कामगिरीत वाशिम जिल्हा प्रथम आला आहे.
................................
प्रतिक्रिया
आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. मॅडम व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेदेखील पूर्ण सहकार्य मिळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नातूनच राज्यात वाशिमचा आरोग्य विभाग सरस ठरत आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. यापुढेही अधिक प्रभाविपणे आरोग्य सेवा पुरविण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे.
- डाॅ. अनिल कावरखे
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
0 Response to " राज्यात वाशिमची आरोग्य सेवा अव्वलच ; सलग तिसऱ्यांदा वाशिमचे ‘सीएस’ नंबर वन !"
Post a Comment