युवाशक्तीच्या सबलीकरणासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' युवकांच्या जीवनात नवीन पहाट !
साप्ताहिक सागर आदित्य
युवाशक्तीच्या सबलीकरणासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना'
युवकांच्या जीवनात नवीन पहाट !
वाशिम, युवक वर्ग शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय शोधात बाहेर पडत आहेत. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये १२ वी पास, विविध ट्रेड मधील आय.टी.आय., पदविकाधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत
राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्यांचा अभाव असल्याकारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम” ही योजना दि.३ डिसेंबर १९७४ पासून राबविण्यात येत होती. सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ
अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे व उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरीता सदर योजनेत शासनाने सुधारणा केल्या आहेत.
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
*मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप* :
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि
मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार
इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच
उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करता येईल.
या योजनेंतर्गत युवकांना ६ महिने कालावधीपर्यंत प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्या जाणार असून प्रशिक्षण कालावधीत शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन दिले जाणार आहे.
*योजनेचे निकष* : प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी युवक महाराष्ट्राचा रहिवासी असावा. युवकाचे वय १८ ते ३५ वयोगटातील असावे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली असून योजनेंतर्गत खासगी व निमशासकीय आस्थापनांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे.
यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभासाठी पात्र उमेदवारांपैकी १२ वी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना प्रतिमाह ६ हजार, आयटीआय किंवा पदविका प्रशिक्षणार्थ्यांना ८ हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण सुरु आहे, असे उमेदवार या योजनेसाठी पात्र असणार नाही.
प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असून लाभार्थ्यांना एकदाच लाभ घेता येणार आहे. या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना व उद्योजकांना त्यांच्याकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रातील २० टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय अस्थापना, उद्योग, महामंडळांमध्ये मंजूर पदांच्या ५ टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.अधिक माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा दि.९ जुलै २०२४ शासन निर्णय अवलोकनार्थ उपलब्ध आहे. कुशल युवा पिढी घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक सर्वोत्कृष्ट निर्णय असुन राज्याला प्रगती पथाच्या एका नव्या शिखरावर नेण्यासाठी सदर योजना महत्त्वपूर्ण ठरेल हा विश्वास आहे !
यासिरोद्दिन काझी,
जिल्हा माहिती अधिकारी
वाशिम
0 Response to "युवाशक्तीच्या सबलीकरणासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' युवकांच्या जीवनात नवीन पहाट !"
Post a Comment