पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकलवरुन वाशिम ते रायगड प्रवास... रायगडावर केले वृक्षारोपन!
साप्ताहिक सागर आदित्य
पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकलवरुन वाशिम ते रायगड प्रवास...
रायगडावर केले वृक्षारोपन!
'पर्यावरणाची वारी, सायकल सवारी' ही टॅगलाईन घेऊन वाशिम जिल्हा परिषद सायकल ग्रुपच्या 8 सदस्यांनी वाशिम ते रायगड हा 650 किलोमिटरचा प्रवास सायकलने पूर्ण केला.
एवढेच नाही तर गडावर जाऊन संभाजीराजे छत्रपती महाराज यांची भेट घेऊन त्यांना झाड भेट दिले आणि रायगडावरील वनाधिकारी श्री भामरे यांच्या समक्ष रायगडावर झाडाचे रोपण करण्यात आले.
वाशिम येथुन दि. 31 मे रोजी निघालेल्या या पर्यावरण सायकल दिंडीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा दिल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी वाशिम येथील सायकलिंग ग्रुप च्या वतीने दिनांक 31 मे ते 6 जून पर्यंत या पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दररोज केवळ 40 किलोमीटर पर्यंत सायकल चालवणारे हे सायकल रायडर्स पहिल्यांदाच पुणे ते रायगड हा 650 किलोमीटरचा प्रवास 5 दिवसात पूर्ण केला. जिल्हा परिषद वाशिमच्या सायकल ग्रुपची ही पहिली आणि एवढ्या दीर्घ पल्ल्याची पर्यावरणपूरक सायकल दिंडी आपल्या मार्गातील चढ- उतार आणि अडथळ्यावर मात करीत 5 जूनच्या पूर्वसंध्येला रायगडावर पोहोचली. वाशिम जि. प. चे सीईओ वैभव वाघमारे यांनी पाठवलेले झाड रायगडावर लावुन संपूर्ण राज्याला वृक्षारोपन वृक्ष संवर्धनाचा संदेश देणार्या या सायकलवीरांचा हा थक्क करणारा सायकल प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
------------------------
मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याचा अपेक्षित परिणाम म्हणून काही राज्यांमधील तापमान 50 ते 53 डिग्री सेल्सियस पर्यंत गेले आहे. तसेच पर्यावरणाचे संतुलन ही बिघडले आहे. लोकांना या बाबीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी या सायकल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. रायगडावर वृक्षारोपण करून या दिंडीचा समारोप करण्यात आला
----------------------
वाशिम ते रायगड या प्रवासादरम्यान आणि मुक्कामाच्या ठिकाणी भेटलेल्या लोकांना या सायकल स्वारांमार्फत पर्यावरणाचे महत्त्व सांगून, त्यांना झाड भेट देऊन ते लावण्याबाबत व जगवण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
या सायकल दिंडीचा पहिला टप्पा वाशिम ते सिंदखेडराजा हा 135 किलोमीटर, सिंदखेड राजा ते देवगड 155 किलोमीटर, देवगड ते अहमदनगर मार्गे रांजणगाव 140 किलोमीटर, रांजनगाव, भीमा कोरेगाव, वढु बु., तुळापुर आळंदीमार्गे मुळशी 133 आणि मुळशि ते रायगड 87 कि. मी. असा 650 किलो मिटरचा प्रवास पूर्ण करत सायकल वर निघालेली ही पर्यावरणाची दिंडी रायगडावर पोहोचली.
पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या सायकल दिंडीमध्ये जिल्हा परिषदेचे सुखदेव जाधव, राम श्रृंगारे, भारत राजस, रामानंद ढंगारे, सतीश लहामगे, निलेश देवकते मिथुन वाळले, शिवकुमार सुर्वे यांनी सहभाग घेतला आहे.
---------------
या सायकल दिंडीच्या प्रवासादरम्यान सिंदखेड राजा पंचायत समितीचे सचिन मिसाळ व सर्व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी सायकल स्वारांचे स्वागत करून प्रोत्साहन दिले. अहमदनगर येथील पुरुषोत्तम जाधव आणि अहिल्याबाईनगर सायकल ग्रुप आणि रोटरी क्लब चे सदस्य यांनीही वाशिम च्या या सायकल स्वारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
वाशिम जिल्हा परिषद चे लेखाधिकारी माणिक नागरे, रायगड येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे आणि वाशिम येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष बोरकर यांनी सायकल दिंडी दरम्यान सहकार्य केले.
------------
0 Response to "पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकलवरुन वाशिम ते रायगड प्रवास... रायगडावर केले वृक्षारोपन!"
Post a Comment