जनावराच्या उपचारासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ जिल्हा परिषदेच्या वतीने हेल्पलाइन नंबर जारी...
साप्ताहिक सागर आदित्य
जनावराच्या उपचारासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’
जिल्हा परिषदेच्या वतीने हेल्पलाइन नंबर जारी...
जिल्ह्यातील पशु पशुपालकांना ऐन पेरणीच्या हंगामात दिलासा देणारा आणखी एक निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी घेतला आहे. आजारी पडलेल्या पशुंवर उपचार करण्यासाठी त्यांनी ‘डॉक्टर आपल्या दारी’ ही मोहिम हाती घेतली आहे. याबाबतच्या सूचना सीईओ वाघमारे यांनी जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागामार्फत संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक 82 75 86 88 00 हा जारी केला आहे. आठवड्यातील सातही दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या क्रमांकावर संपर्क केल्यास डॉक्टर पशुपालक शेतकऱ्यांच्या घरी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये एकूण 58 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये श्रेणी एक ची 17 आणि श्रेणी 2 ची 41 दवाखाने आहेत. काही दवाखान्यामध्ये पशुधन विकास अधिकारी आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांची पदे रिक्त असून त्यांचा प्रभार इतर डॉक्टरांकडे देण्यात आला आहे. तरीही उपलब्ध डॉक्टर त्यांच्या क्षमतेप्रमाणे आजारी जनावरांना घरपोच सेवा देणार आहेत.
हेल्पलाइन सेवा अशी कार्य करणार:
पशुपालकांनी हेल्पलाइन नंबर वर संपर्क केल्यास जिल्हा परिषद कक्षामार्फत संबंधिताचे तपशील नोंदविण्यात येतील. हे तपशील संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर यांच्याकडे पाठवण्यात येतील. यानंतर डॉक्टर पशुपालकांशी संपर्क करून पुढील कार्यवाही करतील.
आजाराची ही लक्षणे दिसल्यास फोन करा:
दगडी कास, स्तनदाह, जार अडकणे, कठीण प्रसुती किंवा जन्म देण्यास बाधा, मायांग बाहेर पडणे, अपघात, सर्पदंश, विषबाधा ई. गंभीर आजाराची लक्षणे आढळल्यास पशुपालकांनी वरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------------------
“जिल्हा परिषदेच्या वतीने पशुपालक शेतकऱ्यांच्या हितासाठी एवढी चांगली सेवा सुरु करण्यात आली असुन जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या उपचारासाठी या सेवेचा लाभ घ्यावा.”
-वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी
--------------------------------------
0 Response to "जनावराच्या उपचारासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ जिल्हा परिषदेच्या वतीने हेल्पलाइन नंबर जारी..."
Post a Comment