प्रसुतीसाठी शासकीय दवाखान्यांना प्राधान्य. १० महिन्यांत १६१०६ प्रसुती; ५१ टक्के प्रसुती शासकीय रुग्णालयात.
साप्ताहिक सागर आदित्य
प्रसुतीसाठी शासकीय दवाखान्यांना प्राधान्य.
१० महिन्यांत १६१०६ प्रसुती;
५१ टक्के प्रसुती शासकीय रुग्णालयात.
मागील १० महिन्यांत जिल्ह्यात १६१०६ प्रसुती झाल्या असून, यामध्ये शासकीय आरोग्य संस्थेतील ८१६२ प्रसुतीचा समावेश आहे. याशिवाय जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांत ५१८७ तर जिल्ह्याबाहेर २७५७ प्रसुती झाल्याची नोंद आरोग्य विभागात आहे. यापुढेही नागरीकांनी खाजगी दवाखान्यांमध्ये प्रसुतीचा खर्च वाढवण्यापेक्षा सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत डिलिव्हरी करून घ्यावी असे आवाहन जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे.
जिल्ह्यात प्रत्येकी एक जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय, सहा ग्रामीण रुग्णालय, २७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ६३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशा शासकीय आरोग्य संस्थेमध्ये प्रसुतीची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय खासगी दवाखान्यांतदेखील प्रसूती केल्या जातात. शासकीय आरोग्य संस्थेमध्ये प्रसूती, वैद्यकीय व रक्त चाचण्या तसेच औषधोपचारासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. गेल्या १० महिन्यांत जिल्ह्यात १६ हजार १०६ प्रसुती झाल्या आहेत. सर्व नागरिकांनी सुद्धा किरकोळ तसेच इतर आजाराकरिता खाजगी दवाखान्यांमध्ये न जाता सरकारी दवाखान्यातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा. सरकारी दवाखान्यातील सुविधांमध्ये काही अडचणी जाणवत असल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात यावे असे आवाहन जि. प. प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
...................
शासकीय, खासगी संस्थेत झालेल्या प्रसुती
तालुका / शासकीय आरोग्य संस्था / खासगी रुग्णालय
वाशिम / ५००१ / २१८२
मालेगाव / ७६३ / ०
रिसोड / ४६७ / ६४४
मं.पीर / ६४३ / ५८
मानोरा / ३४८ / १३
कारंजा / ९४० / २२९०
..........
जिल्ह्याबाहेर खासगी रुग्णालयातील प्रसुती
वाशिम / ४७०
मालेगाव / ४१५
रिसोड / ४७३
मं.पीर / ४१०
मानोरा / ४५४
कारंजा / ५३५
.........
कोट
“वाशिम जिल्ह्यात, बाळाला जन्म देण्याकरिता खाजगी दवाखान्यापेक्षा शासकीय दवाखान्यांना नागरिकांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे दिसुन येत आहे. गेल्या १० महिन्यांत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ५१ टक्के प्रसूती झाल्या आहेत तर ४९ टक्के प्रसूती खासगी रुग्णालयात झाल्या आहेत. शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूतीचा टक्का वाढला असून, येत्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत शासकीय रुग्णालयातील प्रसूतीचा टक्का ६५ पर्यंत घेऊन जाण्याचा जिल्हा परिषद व आरोग्य विभागाचा मानस आहे.”
– वैभव वाघमारे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वाशिम
...........
“सरकारी आरोग्य संस्थेत प्रशिक्षित डॉक्टरांकडून नॉर्मल प्रसुती व वेळप्रसंगी सिझर करण्यात येते. तालुका तसेच जिल्हास्तरावर शासकीय आरोग्य संस्थेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णांनी सरकारी दवाखान्यातील मोफत सुविधांचा लाभ घ्यावा.”
- डॉ. अनिल कावरखे
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
.............
“जिल्हयात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपकेंद्र येथे प्रसुतीकरीता प्रशिक्षीत डॉक्टर, नर्सेस, एएनएम उपलब्ध आहेत. रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली जाते.”
- डॉ. सुहास कोरे
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
0 Response to "प्रसुतीसाठी शासकीय दवाखान्यांना प्राधान्य. १० महिन्यांत १६१०६ प्रसुती; ५१ टक्के प्रसुती शासकीय रुग्णालयात."
Post a Comment