जंतनाशक गोळीचे सेवन करुन जिल्हाधिकाऱ्यांनी केला मोहिमेचा शुभारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
जंतनाशक गोळीचे सेवन करुन जिल्हाधिकाऱ्यांनी केला मोहिमेचा शुभारंभ
२० फेब्रुवारीपर्यंत चालणार जंतनाशक मोहीम ; २ लाख ७२ हजार बालकांना गोळीचे वाटप
वाशिम, : आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १ ते १९ वर्षातील मुलामुलींना जंतनाशक गोळी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालयात केला. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी स्वतः जंतनाशक गोळीचे सेवन करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपसंचालक आरोग्य सेवा अकोला डॉ.कमलेश भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे, प्राचार्य खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधकारी बुवनेश्वरी एस. व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह इतरांनी अगोदर स्वतः जंतनाशक गोळीचे सेवन करुन विद्यार्थ्यांमधील गैरसमज दूर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. जंतसंसर्गाची माहिती, त्याचे परिणाम, प्रसार आणि घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच जंतनाशक गोळीचे वाटप करुन त्याचे फायदे समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना गोळी खाण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार मुलामुलींना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत २ लाख ७२ हजार ६०८ बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मॅाप अप मोहीम
१३ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या मोहिमेत जे विद्यार्थी गैरहजर किंवा आजारी आहेत. त्यांना जंतनाशक गोळी देण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी मॅाप अप मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत १ ते १९ वयोगटातील राहिलेल्या मुलामुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
0 Response to "जंतनाशक गोळीचे सेवन करुन जिल्हाधिकाऱ्यांनी केला मोहिमेचा शुभारंभ"
Post a Comment