
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे क्रीडा दिन उत्साहात साजरा खेळाडूंचा सत्कार, खेळांचे प्रात्याक्षीके व रॅलीचे आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे
क्रीडा दिन उत्साहात साजरा
खेळाडूंचा सत्कार, खेळांचे प्रात्याक्षीके व रॅलीचे आयोजन
वाशिम, : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, वाशिम यांच्या संयुक्त वतीने स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध खेळाचे आयोजन, प्रात्यक्षिक, वृक्षारोपण व रॅलीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कारसुध्दा करण्यात आला. कबड्डीच्या प्रदर्शनीय सामन्यात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र वाशिमचा संघ विजयी झाला. नॅशनल युथ क्लब वाशिमचा संघ उपविजेता ठरला. तिरंदाजी या खेळाच्या स्पर्धा व कराटे या खेळाचे प्रात्याक्षिकसुध्दा यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू गजानन कुऱ्हे, वैभव उगले, रघु घाटोळ, शेख अब्दुल, ललीत जाधव, लखन चव्हाण, (कबडडी) भाग्यश्री बल्लाळ, शितल सावलकर, गुंजण चव्हाण, करण इंगोले (तिरंदाजी) क्षितीज राउत, वृषभ ढवळे, मृणाली आकरे (रायफल शुटिंग) प्रसन्न देशमुख (कराटे) धनंजय गुंडेवार (भारोत्तोलन) इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित खेळाडूंना मेजर ध्यानचंद यांचा आदर्श समोर ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव उज्वल कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन केल.
खेळाडूंनी खेळामध्ये सातत्य राखल्यास निश्चीत यश मिळेल असे मार्गदर्शन प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पुरुषोत्तम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करुन त्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी अनिल धडकर, सुनिल देशमुख, अजय ढवळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाला खेळाडूंना सन्मानाची व पारीतोषीकांची बक्षीसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भगवान इंगळे यांच्या तर्फे प्रायोजित करण्यात आली. सुत्रसंचालन राज्यक्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे यांनी केले. आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी मिलींद काटोलकर, संतोष फुफाटे, कलीम मिर्झा, भारत वैद्य, विनोद जवळकर व भागवत मापारी आदीनी सहकार्य केले.
0 Response to "जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे क्रीडा दिन उत्साहात साजरा खेळाडूंचा सत्कार, खेळांचे प्रात्याक्षीके व रॅलीचे आयोजन"
Post a Comment