-->

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली

 


साप्ताहिक सागर आदित्य 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६


कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय


महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील चढउतार आणि वाढते कर्जबाजारीपण या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही लाखो शेतकरी कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरली आहे.


लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. समाजकल्याण, लोकहित आणि न्यायप्रिय प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन करत शासनाने शेतकरी हिताला प्राधान्य देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये


या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाची २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि निर्धारित कालावधीत न भरलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.


याशिवाय काही थकीत कर्जदारांसाठी एकरकमी तडजोड (One Time Settlement) सुविधेचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेक शेतकरी पुन्हा आर्थिक मुख्य प्रवाहात येऊ शकतील.


लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिलासा


राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या योजनेमुळे सुमारे ५५ ते ५८ लाख शेतकरी लाभार्थी ठरणार आहेत. योजनेसाठी सुमारे ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्याच्या इतिहासातील ही सर्वात व्यापक कर्जमुक्ती योजना मानली जात आहे.


विशेष म्हणजे, पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधून विविध कारणांनी वंचित राहिलेल्या सुमारे पाच लाख शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.


ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना


कर्जमुक्ती ही केवळ आर्थिक मदत नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारी प्रक्रिया आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे अनेक शेतकरी नवीन पीककर्ज घेण्यास किंवा शेतीत गुंतवणूक करण्यास असमर्थ ठरत होते. कर्जमाफीमुळे त्यांची पत पुन्हा निर्माण होईल, बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास वाढेल आणि शेती उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होईल.


यामुळे बियाणे, खते, कृषी यंत्रसामग्री आणि इतर कृषी सेवा क्षेत्रांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण बाजारपेठांमध्ये खरेदी क्षमता वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.


शाश्वत शेतीकडे वाटचाल आवश्यक


कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा असला तरी शेती क्षेत्रातील मूलभूत समस्या दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. सिंचन सुविधा, हमीभाव, पीकविमा, साठवणूक व्यवस्था, कृषी प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेपर्यंत सुलभ पोहोच यांवर अधिक भर देणे आवश्यक आहे.


शेतकरी सक्षम, स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी कर्जमुक्तीबरोबरच उत्पादनवाढ आणि उत्पन्नवाढीच्या उपाययोजना राबविणेही तितकेच महत्त्वाचे आहे.


‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६’ ही केवळ कर्जमाफी योजना नसून शेतकऱ्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करणारा लोककल्याणकारी उपक्रम आहे. लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देत ग्रामीण विकासाला गती देण्याची क्षमता या योजनेत आहे. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकहितवादी विचारांचा वारसा जपत राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिला जात आहे.


जिल्हा माहिती कार्यालय 

वाशिम

0 Response to "लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article