-->

प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याची भूमिका स्वीकारून नागरिकहिताचे निर्णय तातडीने राबवावेत,

प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याची भूमिका स्वीकारून नागरिकहिताचे निर्णय तातडीने राबवावेत,



 साप्ताहिक सागर आदित्य 

समन्वय, नियोजन आणि अंमलबजावणीद्वारे प्रगती साध्य करा

    ‌‌

जिल्हा प्रभारी मुथ्थुक्रिष्णन शंकरनारायणन 


नीती आयोगाची आढावा बैठक 


वाशिम,  जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन आणि एकत्रित समन्वयाने कामे पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याची भूमिका स्वीकारून नागरिकहिताचे निर्णय तातडीने राबवावेत, असे स्पष्ट निर्देश नीती आयोगचे जिल्हा प्रभारी अधिकारी मुथ्थुक्रिष्णन शंकरनारायणन (आयएएस) यांनी दिले.


दि. २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रविण खंडारे , जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम फेरवाणी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रजत बिजवे, मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे, उपशिक्षणाकारी गजानन डाबेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.


कृषी क्षेत्राला प्राधान्य 


शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता पिकांना योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा यासाठी आवश्यक प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. चिया पिकाचे उत्पादन वाढीस लागले असून बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील नियोजन व आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली.

ग्रामीण शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अत्यावश्यक नियोजन आवश्यक असल्याचे प्रभारी अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.


आरोग्य व पशुसंवर्धनावर विशेष भर


गर्भवती महिलांची तपासणी, उपचार सुविधा आणि शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण यावर विशेष भर देण्यात आला. आरोग्य योजनांच्या निधीचा योग्य वापर करून नागरिकांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहिजेत, असे निर्देश देण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. लाळखुरकत प्रतिबंधात्मक लसीकरण प्रभावीपणे राबवून पशुधनाचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.


युवकांना रोजगार संधी – प्रशिक्षण कार्यक्रमात वाढ


युवकांमध्ये कौशल्य विकास वाढीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासोबतच शासनाच्या योजनांची माहिती आणि रोजगार संधी युवकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. अभ्यासक्रम व कोर्सेसच्या अंमलबजावणी साठी योग्य प्रस्तावांसह मागणी करावी, असेही यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने व समन्वयाने जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे,असे आवाहन प्रभारी अधिकाऱ्यांनी यावेळी केले.


जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर म्हणाले, सर्वांगीण विकास हा संयुक्त प्रयत्नांचा परिणाम आहे. प्रत्येक विभागाने उद्दिष्ट निश्चित करून काटेकोर अंमलबजावणी केली आहे . जिल्हा विकासाच्या प्रत्येक निर्देशांकावर उत्कृष्ट कामगिरी करू .  अधिक वेगवान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित कामांची अंमलबजावणी साठी विभाग प्रमुखांनी फील्ड व्हिजिट वाढवून प्रत्यक्ष कामाचा आढावा घ्यावा. निधीअभावी अडचण असल्यास प्रस्ताव सादर करावेत; त्याची प्राधान्याने दखल घेतली जाईल. समन्वय, गती आणि जबाबदारी या तत्त्वांवर काम केल्यास जिल्ह्याचा विकास वेगाने पुढे जाईल, असे त्यांनी सांगितले.


सूचक निर्देशांकांच्या प्रगतीचा आढावा


जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नीती आयोगने निश्चित केलेल्या इंडिकेटरनुसार सातत्याने प्रगती साधणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले.

आरोग्य, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, महिला व बालकल्याण, स्वच्छता, पोषण व पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांतील निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गेल्या तिमाहीत अनेक निर्देशांकांत सुधारणा झाल्याची नोंद करण्यात आली.

सर्व विभागांनी इंडिकेटर सुधारणा हेच प्राथमिक ध्येय ठेवून ठोस पावले उचलावीत, असे निर्देश देण्यात आले.


पीएमश्री शाळांमध्ये सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर


केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या PM SHRI Schools अंतर्गत जिल्ह्यात सध्या १६ शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये अपेक्षित सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे व शाळांचा दर्जा उंचावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्येक शाळा डिजिटल करण्यावर विशेष भर देण्यात यावा. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे ज्या भागात विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात. विद्यार्थ्यांची उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी आकांक्षित तालुक्यातील विविध अभियानांचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोगमुक्त (टीबी मुक्त) अभियानाची उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. ग्रामीण व शहरी भागात आरोग्य, स्वच्छता व पोषण याबाबत जनजागृती वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.


संपूर्णता अभियान २.० : मार्चपूर्वी शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीचे ध्येय

 

संपूर्णता अभियान २.० अंतर्गत आकांक्षीत जिल्हा ५ निर्देशांक व आकांक्षीत तालुका  कार्यक्रमांतर्गत  ६ निश्चित करण्यात आलेले असे ११  निर्देशांक पूर्णत्वास नेणे, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. मार्चपूर्वी सर्व निर्देशांकांची शंभर टक्के परिपूर्णता साध्य करणे हे आपले सामूहिक ध्येय असून त्यासाठी सर्व विभागांनी मिशन पद्धतीने परस्पर समन्वय राखून काम करावे, असे आवाहन नीती आयोगचे जिल्हा प्रभारी अधिकारी मुथ्थुक्रिष्णन शंकरनारायणन यांनी केले.


जिल्हा व आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण, पोषण, कृषी, पायाभूत सुविधा व कौशल्य विकास आदी क्षेत्रांतील निर्देशांकांची पूर्तता करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदाऱ्या निश्चित करून उद्दिष्टपूर्तीसाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करावा, असेही त्यांनी स्पष्ट निर्देश यंत्रणांना दिले.


जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात चांगले काम सुरू असून पुढील काळातही ही गती कायम राहील, अशी अपेक्षा श्री. मुथ्थुक्रिष्णन यांनी व्यक्त केली. सामूहिक प्रयत्न, जबाबदारीची जाणीव आणि प्रभावी अंमलबजावणी यांच्या जोरावर जिल्हा सर्व निर्देशांकांमध्ये उल्लेखनीय प्रगती साध्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


बैठकीस मुख्याधिकारी,  मुख्याध्यापक , गटशिक्षणाधिकारी,विविध विभागांचे अधिकारी व  स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0 Response to "प्रत्येक विभागाने परस्पर सहकार्याची भूमिका स्वीकारून नागरिकहिताचे निर्णय तातडीने राबवावेत, "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article