स्वच्छतेच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समितीत बैठकांचे सत्र … तर एकेक वेतनवाढ थांबविणार
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छतेच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समितीत बैठकांचे सत्र
… तर एकेक वेतनवाढ थांबविणार
वाशिम दि. 7
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रलंबित कामांचा गती देऊन कामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी पंचायत समिती निहाय सभांचे सत्र लावले आहे. बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी त्यांनी सकाळी मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये आणि दुपारच्या सत्रात वाशिम पंचायत समितीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाशिम जिल्हा परिषदेच्या क्रांतिसूर्य महात्मा फुले सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी वाशिम पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेबाबत प्रलंबित कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी हागणदारीमुक्त अधिक झालेली सर्व गावे मॉडेल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत वाशिम तालुक्यातील सुरू असलेली 28 कामे येणाऱ्या 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जी कामे सुरू नाहीत ती कामे आचारसंहितेनंतर 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक शौचालयाची प्रलंबित असलेली कामे आणि घंटागाडी खरेदी बाबतही आढावा घेण्यात आला.
स्वच्छतेच्या कामात विशेषत: सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि गावे मॉडेल करण्याच्या कामात जिल्हा सतत मागे असल्यामुळे प्रधान सचिवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या कामाला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश उप मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांना दिले. त्यानुसार प्रलंबित कामे शासनाने दिलेल्या मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांची एक वार्षिक वेतन वाढ थांबविण्यात येणार असल्याचा ईशारा कुलकर्णी यांनी बैठकीत दिला. तसेच सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापनाबाबत गावात पूर्ण करण्यात आलेल्या कामाची निधी अभावी प्रलंबित असलेली देयके शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
नऊ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कारणे दाखवा:
मंगरूळपीर पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशनची कामे प्रलंबित असणाऱ्या व वारंवार सूचना देऊनही कामात प्रगती न करणाऱ्या 9 ग्रामपंचायत अधिकारी यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिल्या. आढावा सभेमध्ये दिसून आलेल्या असमाधानकारक प्रगतीबद्दल त्यांनी बैठकीरदम्यान आॅन दी स्पॉट कारवाईचा बडगा उगारला. तसेच वाशिम पंचायत समिती अंतर्गत सभेस गैरहजर असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
ऊर्वरीत चारही पंचायत सामित्यांमध्ये पुढील दोन दिवसात बैठका लावण्यात आल्या आहेत.
0 Response to "स्वच्छतेच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समितीत बैठकांचे सत्र … तर एकेक वेतनवाढ थांबविणार"
Post a Comment